कपातली बाग

पूर्वी पुण्यात राहणा:या सरबजित सिंग यांना व्यावसायिक कारणानं दिल्लीला स्थायिक व्हावं लागलं. पुण्यात असताना त्यांच्या बाल्कनीतला ‘हिरवा कोपरा’ कायम फुललेला असायचा. दिल्लीच्या त्यांच्या घरी मात्र तेवढी जागा उपलब्ध नव्हती. पण ‘हिरव्या कोप:या’चा छंद मात्र त्यांनी सोडला नाही. स्वत:ची कल्पकता वापरून चार इंची पीव्हीसी पाइप वापरून भाजीपाल्याचं व्हर्टिकल गार्डन तयार केलं. आता दर महिन्याच्या एका रविवारी त्यांचं संपूर्ण कुटुंब माती, शेणकाला आणि पालापाचोळा यात रमलेलं असतं. त्यांच्या ‘हिरव्या कोप:यात’ ते ‘वाल’ आणि पालेभाज्या पिकवतात.  

पुण्यात राहणा:या श्रवणीच्या घराला बाल्कनी नाही पण तिने घरात जिथे जिथे ऊन येतं तिथे तिथे छोटय़ा वनस्पती लावल्या आहेत. चहाच्या कपाचा कान मोडला की ते कप टाकून दिले जातात. श्रवणीनं याच कपांमध्ये माती भरून त्यात कोथिंबीर लावली आहे. 

म्हणजे काय तर ‘हिरवा कोपरा’ फुलवताना आपल्याकडे किती जागा आहे यापेक्षाही आपल्याकडे असलेल्या जागेचा आपण कल्पक वापर कसा करतो हे जास्त महत्त्वाचं असतं.

आपल्याकडे जागा कमी असेल तर उगीचच मोठय़ा कुंडय़ांचा प्रयोग करू नये. मिनरल वॉटरच्या एक लिटरच्या बाटल्या वरून कापून त्यांचा उपयोग कुंडी म्हणून करता येतो. अशा एका लिटरच्या बाटल्यांच्या कुंडय़ांमध्ये मिरची, अंबाडी, आंबटचुका यासारख्या भाज्या सहज वाढवता येतात. शीतपेयाच्या दोन लिटरच्या बाटल्याही अशाच पद्धतीनं वापरता येतात. या मोठय़ा बाटल्यांमध्ये वाल, काकडी, कारल्याचे वेल छान येतात. याच बाटल्या आडव्या कापल्या की त्यात मेथीही लावता येते. अशा बाटल्या कुंडय़ा म्हणून वापरताना काही गोष्टींची मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. अशा बाटल्या पारदर्शक असतात. त्यामुळे त्यामध्ये लागवड करण्याआधी एक तर ऑईल पेंटनं त्या रंगवून घ्याव्यात किंवा त्यांना रंगीत कापड बांधावं. अशा छोटय़ातल्या छोटय़ा कुंडय़ांमध्ये आपल्या वनस्पती नीट वाढाव्यात म्हणून नीम पावडर, शेण काला आणि अमृतजलाचा सातत्यानं वापर करावा.  

आपल्याकडे असलेल्या बाल्कनीचा आपण विविध कारणांसाठी वापर करतो. कपडे वाळत घालण्यासाठी आणि घरातील जुजबी सामान ठेवण्यासाठी बाल्कनी हीच एक सोयीची जागा असते. मग त्यातच आपला ‘हिरवा कोपरा’ आपण फुलविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या छोटय़ाशा बाल्कनीतील ‘हिरव्या कोप:या’चं नियोजन करताना बाल्कनीत सूर्यप्रकाश येणारी जागा ‘हिरव्या कोप:या’साठी राखीव करून ठेवावी.  बाजारात कुंडय़ांचे विविध प्रकारचे स्टॅण्ड मिळतात. असे स्टॅण्ड कमीत कमी जागेत कुंडय़ांची रचना करण्यासाठी उपयुक्त असतात. आपल्या बाल्कनीत उपलब्ध जागेप्रमाणो असे स्टॅण्ड बनवूनही घेता येतात. बाल्कनीच्या कठडय़ावर कुंडय़ा ठेवायच्या असतील तर त्या तारेनं घट्ट बांधण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं. 
सूर्यप्रकाशाचा प्रत्येक किरण जिथे जिथे येतो तिथे तिथे ‘हिरवा कोपरा’ फुलवणं शक्य आहे. गरज आहे ती फक्त थोडय़ाशा कल्पकतेची. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी www.samyakgreen.in
मंदार वैद्य    mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?