कीड लागलेली भाजी



बाजारात भाजी घ्यायला जा, पाट्यांमध्ये नीट रचून ठेवलेल्या टवटवीत भाज्या मनाला भुरळ घालतात. एकसारख्या आकाराचे लालबुंद टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची चमकदार दिसतात. या भाज्या उत्तम, आरोग्यदायी असं वाटतं तुम्हाला? - तर ते चूक आहे.
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या, कीटकनाशकं न फवारलेल्या भाज्या-फळं अशी एकाच आकाराची, विनाडाग कधीच दिसत नाही. नजर बदलायची गरज आपल्याला आहे.


बाजारात भाजी घ्यायला गेलो की नीटपणानं रचून ठेवलेल्या टवटवीत भाज्या मनाला भुरळ घालतात. समोर रचून ठेवलेले टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची रसरशीत तर दिसतेच पण प्रत्येक फळ एकसारखं दिसतं. वर्षानुवर्षे हेच चित्र आपल्या मनावर एवढं दाट कोरलेलं आहे. भाजीवर थोडासा जरी डाग दिसला तर आपण लगेच पुढच्या भाजीवाल्याकडे वळतो. पण आज चाळिशीत असलेल्या माझ्या मित्रांना त्यांनी त्यांच्या बालपणी पाहिलेला बाजार आठवत असेल. तेव्हा भाजीवाल्या मावशीच्या (जी स्वत: शेतकरीच असायची) टोपलीतील टोमॅटो, भेंडी, वांगी कधीच एकसारखी दिसायची नाहीत. प्रत्येक फळावर किंवा पालेभाजीच्या पानावर छोटासा डाग असायचा, थोडीशी कीड असायची. भाजी निवडताना आई, आजी बरोबर तेवढाच भाग काढून टाकायच्या. प्रत्येक भाजीला स्वत:चा सुगंध असायचा. आणि तेव्हाच्या भाज्यांची चव आताच्या भाज्यांना नाही हे तर सत्यच आहे.

माझ्या एका मित्राच्या आग्रहाखातर मी वांगी, टमाटे आणि कारल्याच्या कुंड्या बनवून दिल्या. माझा हा नवशेतकरी मित्र मनापासून त्यांची काळजी घ्यायचा. कुंड्यातील झाडांना फुलं लागल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं पण नंतर अचानक संवाद कमी झाला. म्हणून एकदा भेटायला गेलो त्याला. त्याच्याकडील कुंड्यामधील सर्वच झाडं एकदम छान दिसत होती. पण बहाद्दरानं आलेल्या मिरच्या, टोमॅटो आणि वांगी मात्र तोडली नव्हती. मी त्याला विचारलं ‘अरे भाज्या का तोडल्या नाहीत?’ त्यावर त्याचं म्हणणं होतं की ‘मिरच्या, टोमॅटोे आणि वांगी एकसारखी दिसत नाहीत. काही टोमॅटो मोठे झालेत तर काही लहानच राहिलेत. बाजारातल्या वांग्यांसारखी ही वांगी तजेलदार दिसत नाहीत. काही मिरच्या सरळ वाढल्यात तर काही वाकड्या झाल्यात. म्हणून मग खायची इच्छाच झाली नाही.’

खरंतर मित्र सांगत असलेल्या भाज्यांच्या तक्रारी हे त्याच्या भाज्या आरोग्यदायी असल्याचं लक्षण होतं. पण ते ओळखण्याची दृष्टी त्याच्याकडे नव्हती.

आपल्या छोट्याशा बाल्कनीत आपण स्वत: पिकवलेली भाजी ही आरोग्यदायीच आहे याची खात्री आपण स्वत:च देऊ शकतो. रोजच्या रोज पाणी घालताना येणारं नवीन पान, वाढणारं प्रत्येक फळ आपण पाहत असतोच. त्या फळभाज्यांवर कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारलेले नाहीत, कोणतंही रासायनिक खत वापरलेलं नाही याची गॅरण्टी पण आपणच देऊ शकतो. पण आधुनिक बाजारात दिसणाºया रसरशीत भाजीपाल्यावर किती विषारी कीटकनाशकं, रासायनिक संप्रेरकं फवारलेली आहेत, किती रासायनिक खतं वापरलेली आहेत, त्यांचा आरोग्यावरचा दूरगामी परिणाम काय याची माहिती मात्र आधुनिक बाजारतंत्र आपणाला कधीच सांगत नाही. रसरशीत भाजीपाल्याची आकर्षक मांडणीची प्रतिमा आपल्या मनावर एवढी खोलवर रु जवली जाते की आरोग्यदायी काय हे आपण पाहत नाही. त्यातून आपल्या खाद्यसवयीची संस्कृती पूर्णत: बदलली आहे.

आपल्याला घरच्या घरी कुंडीत भाजीपाला पिकवायचा, नवशेतकरी व्हायचं असेल तर या रसायनांनी भरलेल्या रसरशीत भाजीपाल्याच्या मोहक खाद्य संस्कृतीचा पुनर्विचार आपल्याला करावाच लागेल. आणि यासाठी गरज आहे ती सेंद्रिय भाजीपाला आणि फळफळावळ ओळखण्याची. हे ओळखण्याचे सोपी सूत्रं आहेत तेवढी फक्त लक्षात ठेवावीत.

सेंद्रिय भाजीपाला कसा दिसतो?
१) नैसर्गिक पर्यावरणात आणि सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेला भाजीपाला आणि फळभाजी कधीच एकसारखी दिसत नाही.
२) या पद्धतीनं वाढवलेला भाजीपाला आणि फळभाजीचा आकार कधीच नैसर्गिक आकारापेक्षा मोठा नसतो.
३) भाजीपाला आणि फळभाजीवर थोड्या प्रमाणात डाग किंवा कीड असणं सर्वसामान्य बाब आहे.
४) सेंद्रिय पद्धतीनं वाढवलेला भाजीपाला आणि फळभाजीला स्वत:चा एक सुगंध असतो. पालकाला पालकाचा, टोमॅटोला टोमॅटोचा, कारल्याला कारल्याचा स्वतंत्र सुगंध असतो.
५) या प्रकारच्या भाजीपाल्याला आणि फळभाजीला भूक जागवणारी चव असते.
६) भाजीपाला आणि फळभाज्या शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो.


आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in

मंदार वैद्य    mandarcv@samyakgreen.in

वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?