झाडांचा पोटोबा
आमच्या शेतातील पाला पाचोळा आम्ही वर्षभर जमा करतो. त्यावर गोमूत्र आणि शेण खताची साधारणत: चार महिन्यांची प्रक्रि या करून त्यापासून उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार करतो. शहरात राहणारे अनेक मित्र-मैत्रिणी आमच्या शेतात येवून शेतात पडलेला पाला पाचोळा, संजीवक माती या सेंद्रिय घटकांनी कुंड्या भरून नेतात. कुंड्या भरताना त्यांचा कल जास्तीत जास्त सेंद्रिय खत भरण्याकडे असतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खत वापरल्यानं आपला ‘हिरवा कोपरा’ अधिक उत्पादक होतो हा मात्र त्यांचा केवळ गैरसमज. कधी कधी खतांच्या अतिरिक्त वापरामुळेही वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो.
सर्व वनस्पतींना नायट्रोजन, पोटयॅशियम आणि फॉस्फरस या प्राथमिक अन्नद्रव्यांची गरज असते. बहुतांश कंपोस्ट खतं याची गरज पूर्ण करतात. या शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही द्वितीय अन्नद्रव्यंही वनस्पतींच्या आरोग्यदायी वाढीसाठी गरजेची असतात. याशिवाय इतर आठ सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही वनस्पतींना अत्यल्प प्रमाणात गरज असते. सर्व प्रकारची अन्नद्रव्यं वनस्पतींना उपलब्ध व्हावीत म्हणून कोणत्याही एकाच प्रकारच्या सेंद्रिय खतावर अवलंबून न राहता विविध सेंद्रिय खतांचं मिश्रण वापरल्यास अधिक फायदा होतो. सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्यानं शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खतं ,गांडूळ खत ,हाडांचं खत, कोंबडी खत, तेल बियांची पेंड यांचा समावेश होतो.
त्या खतांचीच ही एक ओळख.
* सर्वात सहजपणे उपलब्ध होणारं आणि स्वस्त खत म्हणजे शेण खत. पूर्णत: कुजलेल्या शेणखतात नायट्रोजन, फॉेस्फरस आणि पोटयाश असतं. परंतु उकीरड्याच्या पद्धतीमुळे शेणातील सूक्ष्म पोषण मुल्यांचाही बर्यापैकी र्हास झालेला असतो. तरीही वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त कुंडीतील माती भुसभुशीत करून देण्यात त्याची महत्वाची भूमिका असते. शेणखत शेतकर्याकडील उकीरड्यावरून आणलेलं असलं तरी त्यात प्लॅस्टिक तसेच इतर कचरा, खडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते छोट्या चाळणीतून चाळून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत ओलं शेणखत वापरू नये. ओलं शेणखत कुजताना उष्णता निर्माण करतं. तसंच ओल्या शेणात उनी (व्हाइट ग्रब) असते. कुंडीत उनी वाढल्यास वनस्पतींची नवीन मुळं खातात आणि वनस्पतींची वाढ खुरडते.
* बाजारात गांडूळ खत विकत मिळतं. गांडूळ खत खरेदी करताना ते कधी तयार केलेलं आहे याची चौकशी करावी. नुकत्याच तयार केलेल्या गांडूळ खतामध्ये गांडूळांची अंडी असतात. हे खत आपल्या कुंड्यांमध्ये वापरल्यास आपल्या कुंड्यामध्ये नव्यानं गांडुळं वाढतात. परंतु जुन्या गांडूळ खतातील ही अंडी मृतवत होतात म्हणूनच गांडूळ खत जास्तीत जास्त ताजं असावं. कंपोस्ट खतही चांगलं असतं आणि ते स्वस्तात उपलब्ध होतं. कोंबडी खत वापरायचं झाल्यास ते पूर्णत: कुजलेलं असावं.
* नीम पावडर, करंज पेंड, एरंड पेंड या खतांमध्ये प्राथमिक, द्वितीय आणि सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्यं असतात.
* राखेत पोटॅशचे अंश असतात. वनस्पतींच्या चयापचयातील जल संतुलनामध्ये पोटॅश महत्त्वाची भूमिका बजावते. अशा आरोग्यदायी चयापचयामुळे प्रतिकूल हवामानात तग धरून राहाण्याची आणि कीड प्रतिकारकता वाढते. परिणामी फलधारणेत वृद्धी होते.
* आपल्या हिरव्या कोप-यातील वनस्पतींच्या आरोग्यासाठी पुजेच्या निर्माल्याचं पाणी, नासलेलं दूध, वाया गेलेलं दही, ताक, निवडलेल्या पालेभाज्यांचे हिरवे ओले देठ अजिबात वापरू नयेत. त्यामुळे कुंडीतील मातीचा पोत बिघडून वनस्पतीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो.
भरपूर खत घातलं, तर झाडं मस्त जगतील का?
कुंडीतील वनस्पतीलाही वाढीच्या प्रमाणात खताची गरज असते. त्यामुळे आपल्याकडे आहे म्हणून वाट्टेल तेवढी खतं घालून नाही चालत! कुंडीतील मातीच्या २ ते १0 टक्के प्रमाणात अन्नद्रव्यांचं नियमित पुनर्भरण होणं गरजेचं असतं. उदा. ११ इंची कुंडीत साधारणत: ४किलो काडी कचरा व संजीवक माती असते. या कुंडीत वाढणार्या वांगी, मिरचीच्या झाडाला दर महिन्यास किमान ८0 ते १00 ग्रॅम पुनर्भरणाची गरज असते.
कुंड्यांमधील अन्नन्द्रव्यांचं असं पुनर्भरण करताना सेंद्रिय खतांचं सुयोग्य मिश्रण तयार करणं गरजेचं असतं. ढोबळ मानानं ७0 टक्के शेणखत किंवा कंपोस्ट, २0टक्के गांडूळ खत किंवा कोंबडी खत, १0 टक्के नीम पावडर किंवा करंज पेंड यांचं मिश्रण सर्व उपयुक्त अन्नद्रव्यांनी समृद्ध असतं. हे मिश्रण एकाच वेळी कुंडीत घालण्या ऐवजी दर आठवड्याला नियमित पण थोडं-थोडं करून घालावं.
झाडांना खतांची गरजच काय?
सर्व वनस्पती हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेवून सूर्य प्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करतात हे शालेय अभ्यासक्रमात आपण शिकलो होतो. पालक, मेथी, वांगी, मिरची, रताळे असं अन्नाचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी अन्न निर्मितीची प्रक्रि या मात्र तीच असते. कुंडीच्या मातीतील विविध अन्न द्रव्यांचं शोषण करून वनस्पती अन्ननिर्मितीची प्रक्रि या पूर्ण करतात. मातीतील अन्नद्रव्यांच्या यथायोग्य उपलब्धतेवर बीज फलन, पानांचे फुलांचे आरोग्य आणि फलधारणा अवलंबून असते. म्हणूनच सेंद्रिय खतांच्या रूपानं अन्नद्रव्यांचं सातत्यानं पुनर्भरण करणं आवश्यक असतं.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे

Comments
Post a Comment