कुंडीतील रोपाचं हिरवं बालपण


आपल्याला जर आपल्या ‘हिरव्या कोप-या’त भाजीपाला लावायचा असेल तर पहिल्या पावसानंतरचे दिवस हा उत्तम कालावधी असतो. पण नुस्तं पेरलं बी तर आपली लागवड यशस्वी होत नाही. त्यासाठी भाजीपाल्याची लागवड करताना लागवडीचे नियमही काटेकोर पाळावे लागतात. शिवाय जे रोप लावू त्या रोपाचं बालसंगोपन होणंही तितकंच गरजेचं आहे.
लागवड आणि संगोपन करण्याचे काही टप्पे, नियम आणि शिस्त आहे. ती समजून घेतली तर आपला भाजीपाला चांगलं बाळसं धरेल. 

भाजीपाला लावण्याचे नियम
पूर्णत: वाळलेला पाला पाचोळा, कुजलेलं शेणखत, संजीवक माती यासारख्या सेंद्रिय पदार्थानी भरलेल्या कुंडय़ांमध्ये पहिल्या पावसानंतर गोमूत्र आणि शेणकाला याचं द्रावण घालावं.  

कुंडय़ांमध्ये उगवलेलं अनावश्यक तण उपटून पुन्हा मातीत गाडून टाकावं. प्रत्येक कुंडीचं निरीक्षण करून त्यातल्या पाण्याचा नीटपणो निचरा होत आहे ना, याची खात्री करावी.  ही सगळी तयारी झाल्यावर पहिल्या पावसानंतर आपला ‘ हिरवा कोपरा’ खरिपाच्या लागवडीसाठी तयार झाला आहे असं समजावं. 

सर्व प्रथम आपण आपल्या ‘हिरव्या कोप:या’त कोण कोणती पिकं घेणार आहोत याची यादी करावी. त्यानंतर कोणत्या कुंडीत कोणतं पीक घेणार ते ठरवावं.  

पिकाचा विचार करताना आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीत किती जागा आहे याचाही विचार करावा.  कारण त्यावरचं कुंडय़ांची संख्या ठरवता येते. 

कुंडी जरी लहान दिसत असली तरी त्यातील वनस्पती काही आठवडय़ात मोठी होऊन पानांचा व फांद्यांचा विस्तार वाढतो. तसेच कुंडय़ांच्या देखभालीसाठी आपल्याला चारही बाजूनं हात घालता आला पाहिजे याचा विचार करून दोन कुंडय़ांमध्ये किमान एक फूट अंतर असणं गरजेचं आहे. कुंडय़ांची खूप दाटी झाल्यास देखभालीची अडचण होतेच, शिवाय झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये गुंततात आणि किडींचा प्रसार ही झपाटय़ानं होतो. हे रोखता येण्यासाठी म्हणूनही हे अंतर महत्त्वाचं असतं.    

बियाणं रात्रभर गोमूत्रच्या 1० टक्के द्रावणात भिजत घालावं. दुस:या  दिवशी वांगे, टोमॅटो, मिरची, गिलकी, कारली, काकडय़ा यांचं एक एक बी लावावं. 

वेलवर्गीय बिया लावताना कुंडय़ाची जागा निश्चित आणि वेल चढवण्यासाठी योग्य असावी कारण एकदा वेल वाढू लागला की कुंडीची जागा बदलणं अशक्य होतं. 

बी लावताना मातीमध्ये साधारणत: दोन सेंटीमीटर खोलीवर पेरावं. त्यावर हलक्या हातानं माती पसरून द्यावी आणि  त्यावर वाळलेल्या पालापाचोळ्याचा बारीक थर द्यावा. 

रोज हलक्या हातानं पाणी शिंपडावं. बीज अंकुरण्यासाठी साधारणत: एक आठवडा लागतो. ज्या कुंडय़ामध्ये बीज अंकुरणार नाही त्या कुंडय़ातील वरील थरात गांडूळ खत घालून पुन्हा बिजारोपण करावं. 

या पुढील पाच आठवडे वनस्पतींच्या बालपणाचे असतात हे लक्षात घेऊन रोजच्या रोज कुंडीचं निरीक्षण करून त्यांची काळजी घ्यावी.

रोपांचं बालसंगोपन करायचं कसं?
वनस्पतींच्या बालपणात सुरुवातीच्या आठवडय़ात वाढीची गती मंद असते. दर आठवडय़ास एक या पद्धतीनं नवीन पान येतं. तिस:या आठवडय़ापासून दर दोन दिवसांनी एक या गतीनं नवीन फुटवा येतो. प्रत्येक फुटव्याबरोबरच कुंडीतील मुळंही वाढत असतात.  या पद्धतीनं वनस्पतींची वाढ होत नसल्यास पाणी जास्त होत आहे असं समजावं. अशा परिस्थितीमध्ये रोपाच्या भोवतीची माती हलक्या हातानं हलवावी आणि पाण्याचा निचरा नीट होईल, याची दक्षता घ्यावी. 

पाचव्या आठवडय़ामध्ये वनस्पतीचं खोड मजबूत आणि टणक दिसू लागतं. यानंतर वनस्पती बालपणातून तारुण्याकडे वाटचाल करू लागतात. त्यावेळी प्रत्येक कुंडीत थोडी राख मिसळावी. 

आपणाला बियांपासून लागवड करावयाची नसल्यास शहराच्या जवळ असलेल्या हायटेक नर्सरीतून भाजीपाल्याची तयार रोपं आणून लावता येतात. अशा रोपानांही बालपणच्या संगोपनाचे वर सांगितलेले सर्व नियम लागू होतातच. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य   mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?