उजेड वारा सावली
महेश आणि वंदना आमचे कौटुंबिक मित्र. महेश अभियांत्रिकीचा प्राध्यापक आणि वंदना शासकीय अधिकारी. दोघेही झाडांमध्ये रमणारे. आपल्या बंगल्याच्या परिसरात जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी वेगवेगळी झाडं तर लावली आहेतच, पण त्याचबरोबर कुंड्यांमध्ये वेगवेगळा भाजीपालाही लावला आहे. पण लावलेल्या झाडांवर सातत्याने येणार्या रोगाने दोघेही हैराण आहेत. एकदा प्रत्यक्ष त्यांच्या बागेला भेट देण्यासाठी त्यांच्या घरीच गेलो.
बागेचे, आजूबाजूच्या परिसराचे बारीक निरीक्षण केल्यावर लक्षात आले की, समोरच पेरूची भली मोठी बाग आहे. फळबागामध्ये किडी येतातच. वार्याबरोबर या किडीही सहजपणे वंदनाच्या बागेत येत असाव्यात, असं लक्षात आलं. मात्र हे कारण नष्ट करणं वंदनाच्या हातात नव्हतं. तरीही त्यावर उपाय तर करायलाच हवा, आणि तो होता सेंद्रीय पद्धतीनं किटक नियंत्रण करणं ! ते कसं करावं यासाठी थोडा विचार, थोडं निरीक्षण करायला हवं.
अनेकदा काही सोसायटींच्या आवारात प्रवेश करताच आपल्याला मोकळ्या जागेत, जिन्यात पडून असलेल्या कुंड्या दिसतात. काही कुंड्यात मेलेली झाडं दिसतात. काही ठिकाणी अनेक नागरिक उत्साहानं बागकामाला सुरुवात तर करतात, पण लवकरच निराश होतात. नर्सरीतून रोपं आणून कुंड्यांमध्ये लावली जातात; परंतु काही दिवसातच त्या रोपांचं तेज हरवतं. त्यावर वेगवेगळे रोग पडतात. बाजारातून खत आणून घातलं तरी काही उपयोग होत नाही. शेवटी लोक नाद सोडून देतात. असं होतं कारण हिरव्या कोपर्याच्या आणि आपल्या परिसराचा नीटसा विचारच केलेला नसतो.
सूक्ष्म नियोजन कसं कराल ?
* आपली बाल्कनी किंवा गच्ची, जिथे आपण आपला हिरवा कोपरा फुलवणार आहोत तो परिसर समजून घेणं. त्यानुसार नियोजन करणं गरजेचं असतं. वातावरणाचा खोलात विचार करणंही गरजेचं. आपल्या इमारतीची जागा, तिच्या आजूबाजूचे पर्यावरण, जवळपासच्या बागांमध्ये होणारा रासायनिक किटकनाशकांचा वापर याचाही विचार करायला हवा.
* सर्व प्रथम आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीत किती जागा आहे याचा विचार करायला हवा. त्यावर कुंड्यांची संख्या ठरते. कुंडी जरी लहान दिसत असली, तरी त्यातील वनस्पती काही आठवड्यातच मोठ्या होतात. तसेच कुंड्यांच्या देखभालीसाठी आपणाला चारही बाजूनं हात घालता यावा म्हणून दोन कुंड्यांमध्ये किमान एक फूट अंतर असणं गरजेचं आहे. कुंड्यांची खूप दाटी झाल्यास देखभालीची अडचण होतेच, शिवाय फांद्या एकमेकांमध्ये गुंततात. किडींचा प्रसारही झपाट्यानं होतो.
* बाल्कनीतील झाडांच्या वाढीसाठी दिवसातून किमान सहा ते आठ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. कुंड्यांची जागा ठरवताना आपल्या बाल्कनीत कोणत्या ठिकाणी किती वेळ ऊन येतं, किती वेळ मध्यम स्वरूपाची सावली असते याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कोणतीही कुंडी कायम सावलीत राहणार नाही, तसेच कायम उन्हातही राहणार नाही याची काळजी घ्यावी.
* कुंड्यांची मांडणी करण्यापूर्वी वार्याची दिशा व वेग समजून घेणं खूप गरजेचं आहे. वार्याचा वेग खूप जास्त असेल तर वनस्पतींच्या फांद्या, फुलं गळू शकतात. अशा परिस्थितीत कुंड्या उंचावर ठेवू नये. योग्य आडोसा तयार करता आल्यास उत्तम.
* वनस्पतींचा वाढीव तपमान व आद्र्रतेचा मोठा वाटा असतो. पाण्याची गरज आणि त्यावर येणारी कीड यांचाही जवळचा संबंध असतो. आपल्या बाल्कनी किंवा गच्चीची दिशा, आपल्या परिसरात असणार्या इतर इमारतींची उंची, त्यांची पडणारी सावली यासारख्या बाबींमुळे तपमान व आद्र्रता यात फरक पडतो. विविध ऋतुंमध्ये होणारे तपमान व आद्र्रता यांचे बदलही समजून घेणे गरजेचे असते. हवेतील आद्र्रता वाढल्यास किंवा सततच्या ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तपमान व आद्र्रता याचा सातत्याने अंदाज घेत आपल्याला कुंड्यांची काळजी घ्यावी लागते. बदलणारं वातावरण, त्याचे परिणाम याचं नियमित निरीक्षण करून आपली झाडं अधिकाधिक आरोग्यदायी राखणं ही स्वशिक्षणाची एक चिरंतन प्रक्रि या असते.
झाडावर कीड पडली तर.?
1) कोणतेही पान, कळी यावर पांढरे ठिपके किंवा चिकट द्राव दिसल्यास अशी पानं, कळ्या ताबडतोब खुडून टाकाव्यात.
2) वनस्पतींवर कीड दिसो अथवा न दिसो, १0 टक्के गोमूत्र आणि नीम तेलाची आठवड्यातून किमान दोनदा फवारणी करावी. यातून झाडांची प्रतिकारशक्ती वाढते.
3) वनस्पतींवर माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास एक पारंपरिक पद्धत उपयोगी ठरते. पूर्वी अशा वनस्पतींवर राख धुराळण्याची पद्धत होती. एका सुती पातळ कापडात राख घेऊन त्याची पुरचुंडी करावी. झाडांवर जिथे माव्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तिथे एका हाताने ही पुरचुंडी बंदिस्त अवस्थेत धरून दुसर्या हाताने टिचक्या दिल्यास राखेचा बारीक थर माव्यावर तयार होतो. अशा बारीक थरामुळे माव्याची वाढ खुंटून त्याचा प्रसार नियंत्रणात येतो.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे

Comments
Post a Comment