हिरवा कोपरा परिचय
घरातल्या छोट्याशा बाल्कनीत किंवा घराच्या परिसरात आपल्या हौसेचा हिरवा कोपरा अंकुर धरत असतो. आपण त्याला जिवापाड जपतो, तरीही कधीतरी तो रागावतो, मलूल, निराश होतो. हा कोपरा कायम प्रसन्न, टवटवीत राहावा यासाठी आनंदाची लागवड करणारी लेखमाला आपणा पुढे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. मागील काही वर्षात आम्ही आमच्या शेतावर तसेच आमच्या बाल्कनीत केलेल्या शहरी सेंद्रिय शेतीच्या प्रयोतून आणि मीटर मैत्रिणींशी चर्चा करताना जे उमगलं तेते वाचनीय स्वरूपात येथे मांडले आहे. यातील बहुंतांश लेख या आधी लोकमत सखींमध्ये हिरवा कोपरा सदरात प्रकाशित झाले आहेत आणि पुस्तक रूपातही उपलब्ध आहेत. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया आमचा उत्साह वाढवतील आणि टीकात्मक प्रतिक्रिया आम्हाला नव्याने विचार करायला प्रेरणा देतील हा आत्मविश्वास वाटतो. आपल्या सर्व प्रतिक्रिया निःसंकोच पणे नक्की कळवाव्यात ही विनंती..
email mandarcv@samyakgreen.in
या निमित्ताने आमच्या अभिनव सामाजिक उद्योजकतेचा परिचयही करून देणे अगत्याचे ठरेल.
आरोग्यम धनसंपदा असे आपण मानतो. आपल्या कुटुंबाला पौष्टिक, सकस आहार मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील असतो. आपण बाजारातून जो भाजीपाला आणतो तो सत्वयुक्त आहे की रसायनयुक्त या भितीने कधीकधी अस्वस्थही होतो. दिवसागणित वाढणारे आजार, खालावणारी प्रतिकारशक्ती आणि तणावयुक्त, चिंताजनक जीवनमान यात सत्वयुक्त आहाराचे महत्त्व आपणा सर्वांनाच पटते.
रसायनमुक्त, नैसर्गिक, ताजा भाजीपाला आपणच निर्माण केला तर? आपणाला बागकामाची थोडी आवड असेल आणि आपल्या बाल्कनीत थोडी जागा असेल, दिवसातून फक्त पंधरा ते वीस मिनिटे देण्याची आपली तयारी असेल तर आपणही पिकू शकता सेंद्रीय भाजीपाला आपल्यातच घरात.
आपल्या सारख्या शहरात राहून निसर्गाबद्दल आपुलकी बाळगणाऱ्या आणि लहानशा जागेतही भाजीपाला पिकवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘सम्यक ग्रीन’ या सामाजिक उद्योजकतेची निर्मिती आम्ही केली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधणे व त्या उपाययोजनांचा विविध उपक्रमांच्या आधारे प्रचारप्रसार करणे म्हणजेच सामाजिक उद्योजकता. अशा उपक्रमातील सातत्य, संशोधन व अभ्यास हे सामाजिक उद्योजकतेचे महत्त्वाचे गुण आहेत. रसायनमुक्त भाजीपाल्याच्या निर्मितीसाठी तसेच, शहरी सेंद्रीय शेतीचा प्रचार-प्रसार आणि व्यवहार गतिशील करण्यासाठी आम्ही ‘सम्यक ग्रीन’ या सामाजिक उद्योजकतेची निर्मिती केली आहे.
‘सम्यक ग्रीन’या सामाजिक उद्योजकतेची जन्मकथा
आम्ही आमच्या शेतात 2007 पासून सेंद्रीय शेतीचे विविध प्रयोग करत होतो. मूळ प्रेरणा ‘एका काडातून क्रांती’ या पुस्तकाची आणि डॉ. श्रीपाद दाभोलकरांच्या प्रयोग परिवारची आणि दहा गुंढ्याच्या प्रयोगाची होती. त्याचवेळी आमचे अनेक मित्रमैत्रिणी आपापल्या बाल्कनीत, गच्चीत किंवा घराच्या आसपास बगीच्यात विविध फळझाडे, पुलझाडे लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी अनेकांनी उत्साहात सुरुवात केली. नर्सरीतून रोपे आणून कुंड्यांमध्ये लावली, परंतु काही दिवसातच त्या रोपांचे तेज हरवले. त्यावर वेगवेगळे रोग पडले. बाजारातून खत आणून घातले. पण फरक पडला नाही. शेवटी त्यांनी नाद सोडून दिला. आम्हाला त्यांनी हे सांगितल्यावर आम्ही काही कुंड्या पाहिल्या. जवळजवळ वर्षभर अभ्यास आणि या मित्रांशी विचारविनिमय केला. त्यावेळी पुढील बाबी लक्षात आल्या.
1. कुंड्यांसाठी आमच्या मित्रांनी घराच्या आजुबाजुच्या परिसरातील माती जमा केली होती. या परिसरात इतरही बांधकामे सुरू होती. त्या मातीमध्ये काडीकचऱ्यासारख्या जैव घटक जवळजवळ नव्हते. त्यात सिमेंट आणि इतर घटकांचे प्रदुषणही स्पष्टपणे दिसत होते. काडीकचऱ्यासारख्या जैव घटकांच्या आभावामुळे ही माती मृत झालेली होती. त्यामुळेच आवश्यक जीवाणु, गांडुळे यांचा आभाव असल्यानं रोपांनी आवश्यक पर्यावरणीय स्थिती मिळाली नाही. म्हणूनच रोपे तग धरू शकली नाहीत.
2. कुंड्यांमधील झाडांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी घातलेले होते. त्याचप्रमाणे नासलेले दूध, ताक, हळदकुंकवासह पुजेचे तीर्थ यासारखे पदार्थही घातलेले होते. परिणामी मातीचा पीएच बदलला गेला. त्यामुळे कुंडीतील झाडे हळूहळू जळून गेली.
3. बाल्कनीमध्ये कुंड्यांची खूप दाटी झालेली होती. झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटली होती.
झाडे जगत नसल्यामुळे निराश झालेल्या मित्रांना आम्ही विचारले, जर पूर्णत: सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेल्या भाजीपाल्याच्या कुंड्या आम्ही तुम्हाला दिल्या तर तुम्ही त्याची देखभाल कराल का? शहरी सेंद्रीय शेती आणि सेंद्रीय भाजीपाल्याबद्दल आस्था असलेल्या मित्रांनी आम्हाला यावर उत्साहवर्धन प्रतिसाद दिला आणि त्यातूनच 2011 मध्ये ‘सम्यक ग्रीन’ या सामाजिक उद्योजकतेचा जन्म झाला.
मागील काही वर्षात आम्हालाही खूप शिकायला मिळाले. त्यातूनच हा आमचा उपक्रम आकार घेत आहे. आज ‘सम्यक ग्रीन’ पुणे आणि नाशिक येथे सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेल्या भाजीपाल्याच्या कुंड्यांची लायब्ररी चालवतो. त्याचसोबत नाशिक येथे संजीवक माती निर्मितीचा प्रकल्प आणि पुणे येथे नीम पावडर निर्मितीचा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आहे.
शहरी शेती, गच्चीवरची बाग, बाल्कनीतील शेती या सारखे उपक्रम आज सर्वच शहरांमध्ये जोम धरत आहेत. शहरी शेतकरी होणे ही एक जीवनपद्धती आणि शिकण्याची प्रक्रिया आहे. अशा सर्व नवशेतकऱ्यांची शेती सोपी तसंच गतिशील व्हावी म्हणून सम्यक ग्रीन प्रयत्नशील आहे.
मंदार वैद्य
अधिक माहितीसाठी 8669897343
Comments
Post a Comment