कुंडीच्या पोटात पोषणपुरण

व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियामुळे कॉलेजच्या मित्र-मैत्रिणी पुन्हा संपर्कात आल्या आहेत. सुमिता पाटील आम्ही कॉलेजमध्ये असताना आमची सिनियर होती.  आता मुंबईत राहते. मुंबईतील तिच्या घरी तिनंही एक छोटासा हिरवा कोपरा फुलवला आहे. तिने व्हॉट्स अँपवर मला तिच्याकडच्या मिरचीच्या झाडांचे फोटो पाठवले.  सुमीची तक्रार; ‘झाडांना मिरच्याच लागत नाहीत, असं का?’ मी तिला काही खतांची उपाययोजना सुचवली. पण फरक काही पडला नाही. मग मी तिला विचारल, ‘तू कुंड्यांमध्ये काय टाकलं होतं? ती म्हणाली, ‘कुंड्या भरताना जवळजवळ निम्म्या भागात भुईमुगाच्या शेंगांची टरफलं टाकली होती.’ साहजिकच भुईमुगाच्या शेंगांची सालं जसजशी कंपोस्ट होत गेली तशी कुंडीतील माती अधिकाधिक नत्रयुक्त होत गेली आणि फुलं-फळं धारणेसाठी आवश्यक इतर पोषणमूल्यांच्या कमतरतेमुळे  मिरच्यांचा फक्त पर्णसंभारचं वाढत गेला. मातीतच कस नाही, तर झाड फळ कसं धरेल?

खरंतर झाडांची यथायोग्य वाढ व्हावी म्हणून कुंड्या भरतानाच त्यातील पोषणमूल्यांचा विचार करणं गरजेचं असतं. जमिनीवर वाढणार्‍या वनस्पतींपेक्षा कुंड्यात वाढणार्‍या वनस्पतींचं विज्ञान थोडंसं वेगळं असतं. जमिनीवर वाढताना वनस्पतींची मुळं पोषण आणि पाण्याच्या शोधत विस्तारू शकतात; मात्र कुंड्यांमधील वनस्पतींच्या मुळांना हे स्वातंत्र्य नसतं. म्हणूनच आपल्याला कुंड्यांमधील मातीतील पोषणमूल्यांची नीट जोपासना करावी लागते. कुंडी एकदा भरली की ती वर्षानुवर्षे वापरता येते, हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. परंतु वनस्पती वाढत असताना कुंड्यातील मातीत असलेल्या पोषणाचा वापर करत असतात आणि काही महिन्यांतच कुंड्यांमधील माती नि:सत्त्व होते. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी कुंड्या रिकाम्या करून पुन्हा नव्यानं भरणं गरजेचं असतं. कुंडी भरण्याचं एक तंत्र असतं. ते तंत्र वापरलं तर त्यात लावलेल्या झाडाचं पोषण पुढे व्यवस्थित होतं.

कुंडी भरण्यापूर्वी हाताशी काय काय हवं?

गोमूत्र किंवा अमृतजल, सुकलेला काडीकचरा, पूर्णत: कुजलेलं शेणखत, आपण स्वत: तयार केलेली संजीवक माती, बागेतील किंवा शेतातील माती, बारीक चाळलेली वाळू एवढय़ा घटकांची जुळवाजुळव कुंड्या भरण्यापूर्वी करावी लागते. बागेतील किंवा शेतातील माती जमवताना ती वरील चार ते सहा सेंटीमीटर थरातील असावी. वडाच्या झाडाखालील मातीही कुंडी भरण्यासाठी उपयुक्त ठरते. गोमूत्रामध्ये नायट्रोजनसह अनेक अन्नद्रव्य तसेच अनेक संजीवक जीवाणू असतात. वनस्पतीच्या आरोग्यदायी वाढीसाठी गोमूत्र महत्त्वाची भूमिका बजावते. कुंडी भरण्यापूर्वी कुंडीच्या तळाशी टाकायचा सुकलेला काडीकचरा, पालापाचोळा किमान चोवीस तास आधी १0 टक्के गोमूत्राच्या द्रावणात भिजत घालावा. ही चोवीस तासांची प्रक्रि या सावलीत करावी. 
अर्धवट कुजलेला काडीकचरा, पालापाचोळा (१५ ते २0 टक्के), पूर्णत: कुजलेलं शेणखत (५ ते १0 टक्के), संजीवक माती (३५ ते ४0 टक्के), वर सांगितल्याप्रमाणे शेतातील, बागेतील किंवा वडाच्या झाडाखालील माती (१५ ते २0 टक्के) आणि चाळलेली बारीक वाळू (५ ते १0 टक्के) तसेच चुलीतील राख (फक्त अर्धा चमचा) हे घटक योग्य प्रमाणात नीट मिसळून घ्यावेत आणि जुन्या वर्तमानपत्रावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पसरून घ्यावे. त्यावर गोमूत्राची दाट फवारणी करावी. सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिसळून घ्यावं. ही प्रक्रिया किमान दोनदा करावी. शक्य झाल्यास गोमूत्राऐवजी अमृतजल वापरावं.

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य      mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीत औषधी वनस्पती

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?