कुंडीभोवती वेलींचा मंडप
आपल्या ‘हिरव्या कोपर्या’त आपल्याला आवडणार्या वेलवर्गीय भाज्या लावाव्यात असे सर्वांनाच वाटत असतं. पण भाज्यांचे वेल तर खूप मोठे होतात, त्यात त्यांना वाढायला छानसा मांडवच करायला हवा, आपला हिरवा कोपरा तर खूपच लहान आहे मग भाज्यांचे वेल कसे लावणार असा विचार करून अनेकजण इच्छा असूनही वेलवर्गीय भाज्या लावत नाहीत. मात्र थोडासा शोध घेतला तर आपल्या छोट्याशा ‘हिरव्या कोपर्या’तही आपल्याला वेलवर्गीय भाजीपाला लावता येईल.
सर्वप्रथम आपल्याला कोणत्या वेलवर्गीय भाज्या लावायच्या आहेत याचं नियोजन करायला हवं. बाल्कनीत लाल भोपळा आणि दुधी भोपळा लावण्यासाठी कुंडीच्या चारही बाजूंनी किमान चार फूट जागेची गरज असते. पण गच्चीवर मात्र या दोन भाज्या अगदी मस्त वाढतात. कारली, काकडी, तोंडली यांसारख्या भाज्या आपण बाल्कनीसारख्या लहान जागेतही सहज लावू शकतो.
तोंडली
तोंडल्याचा वेल बहुवर्षीय आहे. साधारणत: १४ ते १६ इंची कुंडीत तोंडल्याचा वेल छान वाढतो. कुंडीतील माती सातत्यानं हलवून त्यात दर महिन्यास किमान १00 ग्रॅम सेंद्रिय खत घालत राहिल्यास वर्षभर तोंडली मिळत राहतात. कुंडीत तोंडल्याचा वेल वाढवताना मुख्य खोड साधारणत: सहा इंचापर्यंत वाढू द्यावे. त्यानंतर चांगल्या दोन फांद्या ठेवाव्यात आणि त्याखालील इतर फुटवे सातत्यानं खुडत राहावेत. या दोन फांद्या मग आपल्याला जिथे चढवायच्या आहेत तिथे चढवाव्यात. बारीक तारेनं प्रत्येक फांदी हलक्या हातानं बाकल्नीच्या भिंतीवरून फिरवणं हा या दोन फांद्या चढवण्याचा सोपा मार्ग. कुंडीच्या वरच्या व्यासात नीट बसेल असा पाच फूट उंच गोलाकृती लोखंडी स्टॅण्डही आपण बनवून घेऊ शकतो. अशा स्टॅण्डमुळे वेल बरोबर कुंडीच्या वरच वाढतो. तोंडल्यांची छाटणी करणं गरजेचं असतं. प्रत्येक ऋतू बदलताना तोंडल्याची छाटणी करून वेलाला थोडीशी विश्रांतीही घेऊ द्यावी.
कारली
कारल्याचा वेलही बाल्कनीत छान वाढतो. नीट जोपासला तर कारल्याचा वेल अगदी १८ महिनेही कारली देत राहतो. उच्च प्रतीच्या सेंद्रिय खतानं आणि संजीवक मातीनं भरलेल्या १२ इंची छोट्याशा कुंडीतही कारल्याचा वेल फुलतो. कारल्याचा वेल थोडा पातळ असतो आणि वर सांगितल्याप्रमाणे स्टॅण्ड केल्यास छोट्याशा जागेत एक वेल एका महिन्यास किमान तीन ते पाच कारली देतो. सातत्यानं सेंद्रिय खताची मात्रा देत राहणं हे कारल्यासाठीही आवश्यक आहे. कारल्याप्रमाणेच काकडीचा वेलही १२ इंची कुंडीत येतो. गिलकी, दोडकी, आणि घोसाळ्याचे वेलही १४ इंची कुंडीत छान वाढतात. त्यांची लागवड मात्र पावसाळ्याच्या सुरु वातीला करायला लागते.
वाल
आपल्या ‘हिरव्या कोपर्या’त वेलवर्गीय भाज्यांचा विचार करताना आपल्या सगळ्यांना आवडणारा ‘वाल’ विसरून कसं चालेल. पावटा, कडवा, शिपाई, डबल बी, पापडी, चपटी, माखण्या, घोट अशा वालाच्या अनेक जाती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात लोकप्रिय आहेत. घरी पाहुणे आले की बिरड्याची उसळ हा महत्त्वाचा मेनू असतो. पावट्याचे वेल निरनिराळ्या जातींप्रमाणें लांब, फार लांब व आखूड असतात व शेंगाही आखूड, लांब, चपट्या अशा दिसतात. आपल्या छोट्याशा हिरव्या कोपर्यात वाल अगदी मुक्तपणे वाढतो. पावसाळ्याच्या मध्यावर वालाची लागवड कुंडीत केली की अगदी दिवाळीपर्यंत वालाच्या शेंगा मिळत राहतात. वालाच्या वेलीला एक प्रकारचा सुगंध असतो. हा सुगंध आपल्याला कायम गावाकडच्या मातीची आणि बांधावरून चालता चालता तोडून खाल्लेल्या वालाच्या कोवळ्या शेंगांची आठवण करून देईल! विशेष म्हणजे, वेलवर्गीय वनस्पती रोगाला अभावानेच बळी पडतात. परंतु गोमूत्र आणि नीम तेलाची सातत्यपूर्ण फवारणी केल्यास वेलींची प्रतिकारक्षमता वाढवता येते.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे

Comments
Post a Comment