‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त


‘हिरव्या कोप:या’चा प्रयोग अनेकांनी सुरू केला आहे. आणि म्हणूनच आपला ‘हिरवा कोपरा’ फुलवताना अनेकांना प्रश्न पडत आहेत तर अनेकांना विविध प्रश्नांनाही सामोरं जावं लागत आहे. काही वाचकांनी अलीकडेच  ‘मिलीबग’च्या समस्येविषयी विचारलं.

ही  ‘हिरव्या कोप:या’तील एक नित्याची समस्या आहे. जास्वंद, टोमॅटो, वांगी आणि पालेभाज्यांवर हा कीटक वेगानं वाढतो.  वनस्पतीवर सुरुवातीला अगदी थोडय़ाशा प्रमाणात दिसणारा हा पांढरा पिठाळ कीटक हळूहळू  ‘हिरव्या कोप:या’तील सर्वच वनस्पतींवर पसरतो. तोच हा मिली बग.  वनस्पतीच्या पानातील तसेच नाजूक खोडातील रस शोषणारी ही कीड आहे.  अति आर्द्र आणि उष्ण (आपण ज्याला उकाडा म्हणतो) असं हवामान मिली बगच्या प्रादुर्भावासाठी कारणीभूत ठरतं. तसेच कुंडय़ामधील मातीतील नायट्रोजनचं प्रमाण अधिक असेल तर ते मिली बगसाठी निमंत्रणच ठरतं.  मिलीबगची मादी एका वेळेस 300 अंडी घालते आणि अंडय़ांभोवती कापसाप्रमाणो दिसणारे शर्करायुक्त आवरण तयार करते. मिलीबगमुळे आपण लावलेल्या वनस्पतींचं नुकसान मोठय़ा प्रमाणावर होतं. त्यामुळेच मिलीबग ही अवघड समस्या वाटतेही; पण या मिलीबगचं नियंत्रण करणं हे फार काही अवघड नाही.

‘मिलीबग’ला रोखण्याच्या काही युक्त्या 
1  योग्य पोषणमूल्य असलेल्या मजबूत वनस्पतींवर मिलीबगचा हल्ला क्वचितच होतो. आपण आपल्या कुंडय़ांमधील वनस्पतींच्या पोषणासाठी वेळोवेळी सेंद्रिय खतांचा वापर करतो. यात कंपोस्ट आणि गांडूळ खतात नायट्रोजनची मात्र अधिक असते व या खतांचा अतिरिक्त मारा केल्यास मिलीबगला निमंत्रण मिळतं हे लक्षात घेऊन सेंद्रिय खतांचा डोस एकाच वेळी देण्याऐवजी कमी प्रमाणात पण सातत्यानं द्यावा. उदा. एकदम 100 ग्रॅम सेंद्रिय खत कुंडीत घालण्याऐवजी हे खत आठवडय़ातून एकदा 25 ग्रॅमप्रमाणो चार आठवडे सातत्यानं घालावं. तसेच नायट्रोजनचं प्रमाण संतुलित करण्यासाठी अत्यल्प प्रमाणात राखही टाकावी.

2  मिलीबग दिसो अथवा न दिसो आर्द्र आणि उष्ण हवामानात नीम तेलाची आठवडय़ातून दोनदा व इतर वातावारणात आठवडय़ातून एकदा फवारणी केल्यास ती  मिलीबग विरोधात प्रतिकारकाचं कार्य करते.  

3 दोन कुंडय़ांमधील अंतर किमान एक ते दीड फूट असावं जेणोकरून वनस्पतींच्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतणार नाहीत आणि मिलीबग एका कुंडीतून दुस:या कुंडीतील वनस्पतीवर प्रवास करणार नाही. 

4 वनस्पतींवर मिलीबग किंवा अंडी दिसल्यास पाण्याच्या जोरदार प्रवाहानं हे कीटक व अंडी धुवून काढावी. मात्र असे करताना कुंडी इतर कुंडय़ांपासून दूर नेऊन हे करावं. अन्यथा मिलीबग एका वनस्पतीवरून दुसरीवर जाऊ शकतो. 

5 काळी मुंगी  ‘हिरव्या कोप:या’ची मैत्रीण. वर सांगितल्याप्रमाणो मिलीबगची मादी अंडय़ांभोवती कापसाप्रमाणो दिसणारं शर्करायुक्त आवरण तयार करते, जे काळ्या मुंग्यांचे आवडते खाद्य आहे. मिलीबगचा प्रादुर्भाव वाढताना दिसू लागल्यास सौम्य प्रमाणात गुळाचं पाणी,  माती व पानं तसेच फांद्यावर पसरल्यास आपसूकच काळ्या मुंग्या जमा होतात व त्या मिलीबगच्या अंडय़ाचाही फडशा पडतात.

6   या व्यतिरिक्त गोमूत्र, लसूण आणि मिरची यांचा घरी तयार केलेला अर्क मिलीबग नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

मंदार वैद्य 
ई-मेल mandarcv@samyakgreen.in
आमच्या सेवा आणि  उत्पादनाबद्दल जाणून घेण्या साठी: www.samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?