कुठली कुंडीकशासाठी?
आम्ही शाळेत असताना दुधाच्या पिशव्यांमध्ये, घरात रिकाम्या झालेल्या तेला-तुपाच्या डब्यांमध्ये झाडं लावायचो. त्या दुधाच्या पिशवीतील हळूहळू मोठय़ा होणार्या झाडाची मुळं पिशवीतून बाहेर यायची, असं व्हायला लागलं की, झाड जवळच्या बागेत किंवा मोठय़ा पिशवीत लावायचं. तेव्हा कुंड्या बर्याच महाग असायच्या आणि घरात रिकाम्या होणार्या तेला-तुपाच्या डब्यांचं आरक्षण आधीच दुसर्याच कारणांसाठी झालेलं असयाचं. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या मिळतात. आपला ‘हिरवा कोपरा’ अधिकाधिक सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी योग्य प्रकारच्या आणि आकाराच्या कुंड्या निवडणं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. हे काम नियोजनबद्ध पद्धतीनं केलं नाही तर मात्र पुढे झाडांच्या वाढीचे, जागेच्या उपयोगाचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात.
बाजारात विविध आकाराच्या आणि प्रकारच्या कुंड्या मिळतात. आपल्या हिरव्या कोपर्यातील शहरी शेतीसाठी उपयुक्त कुंड्या निवडताना विविध प्रकारच्या कुंड्यांचे फायदे-तोटे समजावून घेणं गरजेचं आहे. कुंड्या निवडताना आपला हिरवा कोपरा सुबक आणि सुंदर दिसणं महत्त्वाचाचं आहे. हा हेतू साध्य करायला कुंड्यांची निवड मदत करते.
माझ्या बर्याचशा मित्र-मैत्रिणींनी हिरव्या कोपर्यातील झाडं-वेली अधिकाधिक मोठय़ा व्हाव्या म्हणून उत्साहानं मोठय़ा कुंड्या विकत आणल्या मोठय़ा कुंडीत झाड मोठं होतं हा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी कुंडीचा व्यास आणि खोली याचं सर्वसाधारण गणित ठरलेलं आहे. उदा. मिरची, वांगी, कारली, काकडी, भेंडी यासारख्या वनस्पती ११ इंची कुंड्यामध्ये सहजपणे चांगल्या फोफावतात. तर कढीपत्ता, तोंडली, दुधी भोपळा, लाल भोपळा या वनस्पतींसाठी किमान १४ इंची कुंडीची गरज असते. पेपर मिंट, पुदिना, तुळस, इन्सुलिन या सारख्या वनस्पती ८ इंची कुंड्यांमध्ये छान वाढतात. लिंबू, शेवगा यासारख्या वृक्षवर्गीय वनस्पतींसाठी मोठे कापलेले ड्रम वापरता येतात. अर्थात आपण कुंड्या भरताना कोणती माती, किती जैविक काडी-कचरा, संजीवक माती अणि सेंद्रिय खत वापरतो यावर हे सारं गणित अवलंबून असतं. आपण आपल्या हिरव्या कोपर्यात कोण-कोणती झाडं-वेली लावणार आहोत याची यादी आधी तयार करून त्या नंतर कोणत्या आकाराच्या किती कुंड्या घेणार हे ठरवणं अधिक फायद्याचं ठरतं.
मातीची, सिमेंटची की प्लॅस्टिकची?
मातीच्या व सिमेंटच्या कुंड्या जड असतात व त्यांना आपल्या बाल्कनीत नेणं, तसेच त्यांची हलवा-हलव करणं जिकीरीचं असतं. मातीच्या कुंड्या स्वस्त असतात, परंतु त्यांची तूट-फूट होण्याची शक्यता जास्त असते. सिमेंटच्या कुंड्या महाग तर असतातच आणि त्या जास्त जागाही व्यापतात. या सर्व बाबींचा विचार करता प्लॅस्टिकच्या कुंड्या हिरव्या कोपर्यातील शहरी शेतीसाठी अधिक उपयुक्त ठरतात. बाजारात विविध आकाराच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या मिळतात.
गोल कुंड्यांची गरज
वनस्पतीची मुळं चक्राकार पद्धतीनं वाढतात, हे लक्षात घेऊन गोल कुंड्या आपल्या झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. कुंडीत वाढणार्या वनस्पतींची वाढ ही मातीत वाढणार्या केशमुळांच्या वाढीवर अवलंबून असते. कुंडीतील माती आणि कुंडीचा आकार या केशमुळांना पूरक असणं आवश्यक आहे. त्यामुळेच तळाशी खूप निमुळत्या
होणार्या कुंड्या निवडू नयेत. वनस्पतीच्या मुळांची वाढ यथायोग्य होण्यासाठी कुंड्यांच्या तळाचा व्यास व वरील व्यास यात एक ते दीड इंचापेक्षा जास्त फरक असणार नाही हे पाहावं.
आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे
Comments
Post a Comment