कुंडीत औषधी वनस्पती

सुट्टीत गेल्यावर उन्हातान्हात हुंदडून, आंबटचिंबट खाऊन हमखास आजारी पडायला व्हायचं. दिवसभर शेतीच्या कामात आणि गायीगुरांची काळजी घेण्यात व्यग्र असलेल्या आजी-आजोबांचे लक्ष आपल्या खोकल्याकडे जाऊ नये असं कितीही वाटलं तरी पकडले जायचोच. मग घरगुती औषधं सुरू व्हायची. सहाणीवर उगाळलेल्या सुंठेचा लेप, तुरटी, हळद, आल्याचा रस, मध याचे चाटण आणि झोपताना कंपलसरी हळद घातलेले दूध असे अनेक उपचार. माझ्या आजोबांचे त्यांच्याच वयाचे एक मित्र आमच्याकडे आले की, स्वत:सह सगळ्या मुलांना कडुनिंबाच्या काडीने दात घासायला लावायचे. आमच्या आजोबांनी लावलेल्या गावठी गुलाबाची फुलं थोड्याशा साखरेसह काचेच्या बरणीत घालून आम्ही गुलकंद करायला ठेवायचो. हे असं सारं आपण आपल्या छोट्याशा हिरव्या कोपर्‍यात रुजवू शकतो का, स्मरणरंजन थांबवून काही गोष्टी पुन्हा आयुष्यात आणू शकतो का? औषधी वनस्पतींची लागवड हिरव्या कोपर्‍यातही होऊ शकते!

तुळस
त्यात पहिली तुळस! औषधी वनस्पतींचा विचार करताना सर्व प्रथम तुळशीचे नाव पुढे येतं. तुळस ही रोगनाशक शक्ती मानली जाते. विशेषत: सर्दी, खोकला, ताप या आजारांमध्ये तुळस प्रभावकारी औषध आहे. राम तुळस, कृष्ण तुळस, रान तुळस असे तुळशीचे अनेक प्रकार आहेत. राम तुळस गडद हिरव्या रंगाची असते, तर कृष्ण तुळस काळपट असते. कृष्ण तुळसेचा सुगंध राम तुळसेपेक्षा जास्त उग्र असतो. रान तुळसेच्या पानांचा वास अति उग्र असतो. तिच्या मंजुळांचा आकारही मोठा असतो. तुळशीचे रोप आठ इंची कुंडीत अगदी सहज वाढते. फक्त कुंडीतील मातीत सातत्यानं शेणकाला, गोमूत्र, कुजलेला काडीकचरा टाकत राहावा. तुळशीच्या मंजुळा ओल्या असतानाच खुडून टाकाव्यात. महत्त्वाचं म्हणजे पूजेचे दुधदहीमि२िँं१्रूँं१त पाणी निर्माल्यासह कुंडीत अजिबात टाकू नये. रोज तुळशीचं किमान एक पान तरी खावं, त्या निमित्तानं कुंडीची देखभालही करावी. 

कोरफड  
आणखी एक कणखर वनस्पती म्हणजे कोरफड. हल्ली कोरफडीच्या वापराबद्दल खूपच जाणीव निर्माण झाली आहे. कुंडीमध्ये ही कोरफड छान वाढते. कोरफडीचा ताजा गर अंघोळीपूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरफडीचा रस घेतल्यास अपचनाच्या अनेक तक्र ारी दूर होतात. कुंडीतील कोरफडीची पानं तोडताना सर्वात खालचं पान धारदार सुरीनं कापावं. कुंडीतील मातीचे सातत्याने पुनर्भरण करावे.

गवती चहा आणि पुदिना
गवती चहा आणि लांबट पानाचा पुदिनाही आठ इंची कुंडीत लावावा. गवती चहा, पुदिन्याची पानं आणि तुळशीची पानं एकत्र उकळून छान उत्साहवर्धक पेय तयार होते. चहाची सवय कमी करण्यासाठी हे पेय हा उत्तम पर्याय आहे. 
अडुळसाआणखी एक औषधी वनस्पती म्हणजे अडुळसा. गर्द हिरवी पानं आणि पांढर्‍या फुलांचे घोस असलेले अडुळशाचे झाड. खोकला बरा होण्यासाठी अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस उपयुक्त असतो.

हळद-गुळवेल
हळद,  पुनर्नवा, गुळवेल यांसारख्या इतर वनस्पतींची लागवडही आपण गरजेनुसार करू शकतो. नियम एकच कोणतेच रासायनिक खत अजिबात वापरायचे नाही. 

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in

मंदार वैद्य ई-मेल mandarcv@samykagreen.in 

वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 



Comments

Popular posts from this blog

‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?