घोट-घोट पाणी


कल्याणला राहणार्‍या अमित भेलोंडे यांनी मध्यम आणि मोठय़ा कुंड्यांमध्ये जास्वंदीची झाडं लावली आहेत. या झाडांना नक्की किती आणि कसं पाणी घालावं, असा प्रश्न त्यांनी ई-मेलवर विचारला. अनेकांना खरं तर हा प्रश्न पडतो की, झाडांना नेमकं किती आणि कधी पाणी घालावं? 

वनस्पती जमिनीतील अन्नद्रव्यांचे वहन, प्रकाश संश्लेषण तसंच चयापचयासाठी पाण्याचा वापर करतात. जास्तीचे पाणी वनस्पतींना हानिकारक ठरतं आणि पाणी कमी पडलं तर वनस्पतींची वाढ खुंटते. झाडांची पाण्याची गरज प्रत्येक ऋतूप्रमाणे बदलत असते. प्रत्येक ऋतूत कुंड्यांमधील वनस्पतींना  योग्य प्रमाणात पाणी देण्याबरोबरच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी काही उपाययोजनाही कराव्या लागतात.  

त्यासाठी लक्षात ठेवायचा सोपा नियम एकच साधारणत: कुंड्यांमधील मातीच्या आकारमानाच्या ५ टक्के पाणी कुंडीत कायम असावं. कुंड्यांना पाणी देताना खूप पाणी देऊ नये. पाणी घातल्यावर कुंडीच्या तळातून अगदी थोडेसे पाणी बाहेर येईल एवढंच पाणी घालावं. 

पाणी देताना पाइपऐवजी हातानं पाणी घालणे कधीही चांगलं. पाइपने पाणी दिल्यास ते मातीत हळुवार मुरण्याऐवजी ते वेगानं कुंडीच्या तळाशी जातं आणि अन्नद्रव्यांचा र्‍हास होतो. 
कुंडीतील मातीच्या वरील भागात किमान एक दीड इंचाचे पूर्णपणे वळलेल्या पालापाचोळ्याचे आवरण (मल्चिंग) कुंडीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी करते.

मात्र तरीही झाडांना पाणी घालताना प्रत्येक ऋतूतलं नियोजन वेगळं हवं!

पावसाळा
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढते आणि कधी कधी पावसाचे पाणीही कुंड्यांमध्ये पडते. अशा परिस्थितीत कुंड्यातली अन्नद्रव्ये पाण्याबरोबर वाहून जातात. माती गच्च होते. अशा परिस्थितीत कुंड्याच्या वरील थरात पूर्णत: सुकवलेला काडी टाकावा.  सातत्याने संजीवक मातीची भर देत राहावी. कुंडी मोठी असल्यास मोठय़ा वनस्पतीच्या बाजूने कोथिंबीर, मेथी, पालक यासारख्या भाजीपाल्याच्या बिया टाकव्यात. या छोट्या वनस्पतींची वाढणारी दाट मुळं कुंडीतील अन्नद्रव्यं धरून ठेवण्यास मदत करतात. पावसाळ्याता गरज असेल तरच कुंड्याना पाणी द्यावं.

हिवाळा
हिवाळ्यात कुंडीतील पाण्याचे बाष्पीभवन हळुवार होते. त्यामुळे रोजच्या रोज पाणी देण्याची गरज नसते. 

ऑक्टोबर हीट आणि कडक उन्हाळा
एप्रिल-मेच्या उन्हाळ्यात वनस्पतींचं उष्णतेपासून संरक्षण करणं फार गरजेचं. कुंड्या प्लॅस्टिकच्या असतील तर त्यांना दुपारचे ऊन थेट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. उन्हाने प्लॅस्टिक जास्त गरम होते. परिणामी कुंडीतील मातीच्या ओलाव्याचे वेगानं बाष्पीभवन होतं. कुंडीतील माती व कुंडीची कड यात छोटीशी भेग निर्माण होते. वनस्पतींची नवजात पांढरी केशमुळे कुंडीच्या याच कडांमध्ये वेगाने वाढत असतात. त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वनस्पती मलूल दिसू लागतात. ऊन आणि कुंडी (वर वाढलेली वनस्पती नव्हे) यात आडोसा निर्माण करावा. तुटलेल्या फारश्या, जुन्या साड्या, हिरवे शेड नेट याचा कल्पक वापर उपयोगी ठरतो. गच्चीवर येणार्‍या उन्हाच्या दिशेचा अभ्यास करून कुंड्यांची रचना बदलल्यास हा प्रश्न सुटू शकतो.

आमच्या सेवा आणि उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी: www.samyakgreen.in
मंदार वैद्य   mandarcv@samyakgreen.in
वरील लेख लोकमत सखी मध्ये हिरवा कोपरा या लेखमालेत प्रकाशीत झाला आहे 

Comments

Popular posts from this blog

‘मिलीबग’चा पक्का बंदोबस्त

कुंडीभोवती वेलींचा मंडप

कुठली कुंडीकशासाठी?